<img src="https://web.archive.org/web/20151117103326im_/http://timeslog.indiatimes.com/timeslog.dll/topcnt?CHUR=maharashtratimes.indiatimes.com&amp;nojs=1" style="display:none;visibility:hidden;" border="0" height="0" width="0"><img style="display:none;visibility:hidden;" border="0" height="0" width="0" src="https://web.archive.org/web/20151117103326im_/http://cmstrendslog.indiatimes.com/cmslog.dll?cms-msid=19026839&amp;cms-sec0=2429614&amp;cms-sec1=2429054&amp;cms-sec2=2147477892&amp;cmsurtype=viewed">
The Wayback Machine - https://web.archive.org/web/20151117103326/http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-19026839,prtpage-1.cms
Printed from

The Maharashtra Times -Breaking news, views. reviews, cricket from across India

माझिया मना, जरा थांब ना...

Mar 18, 2013, 01.52AM IST  
SHARE
AND
DISCUSS
मराठी चित्रपट , नाटक आणि मालिकांच्या क्षेत्रातील श्रेष्ठ कलाविष्कारांचा यथोचित गौरव व्हावा , त्याला अधिक झळाळी लाभावी , अधिक वलय प्राप्त व्हावे म्हणून ' महाराष्ट्र टाइम्स ' ने १३ वर्षांपूर्वी ' मटा सन्मान ' पुरस्कार सुरू केले. त्यानंतर अनेकांनी या प्रकारचे पुरस्कार सुरू केले , तरी याबाबतीत मटाचे म्होरकेपण कायम आहे.

पुरस्कार सोहळा म्हणजे केवळ मनोरंजनाच्या चार घटका नसून , त्यालाही सामाजिक विचारांची जोड दिली पाहिजे आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या साच्यातही वेळोवेळी बदल केले पाहिजेत , हे भान मटाने सतत बाळगले. त्याचेच दृश्यरूप म्हणजे या वर्षीचा देखणा ' कोहिनूर मटा सन्मान ' सोहळा होता. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याने गेल्या वर्षातील उत्कृष्ट सर्जनशीलतेवर पुरस्काराची मुद्रा उमटवली. ठराविक साचाची नाच-गाणी आणि विनोद याऐवजी ' कोहिनूर मटा सन्मान ' मध्ये मराठी चित्रपटाची शंभरी अतिशय विचारपूर्वक , मटाच्या परंपरेला शोभेलशा वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

मराठी चित्रपटांच्या वाटचालीत महत्त्वाचे स्थान असलेल्या आणि वेगवेगळ्या काळात आपले लक्षणीय योगदान देणाऱ्या अभिनेत्री सीमा देव , दिग्दर्शक जब्बार पटेल आणि संगीतकार अशोक पत्की यांच्या मुलाखतींनी पुरस्कारांची माळ सजविली होती. या दिग्गजांना बोलते करीत इतिहासाला शब्दरूप देण्याचे काम केले , कवी सौमित्र उर्फ अभिनेता किशोर कदम यांनी. गुणवंतांचा गौरव करणाऱ्या या रंगीत सोहळ्यात अर्थातच सर्वोच्च आनंद आणि औत्सुक्याचे क्षण होते , ते ' महाराष्ट्र भूषण ' पुरस्कार आणि ' युथ आयकॅान ' पुरस्काराचे. साहिर लुधियानवी यांच्या ' अश्कोमे जो पाया है , वो गीतोंमें दिया है ' या ओळींचे आयुष्य प्रत्यक्षात जगलेल्या , दैवी स्वर लाभलेल्या गायिका आशा भोसले यांना बुजूर्ग संगीतकार खय्याम यांच्या हस्ते महाराष्ट्र टाइम्सचा ' महाराष्ट्र भूषण ' पुरस्कार देण्यात आला.

खय्याम यांना संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या ' उमराव जान ' साठी आशा भोसले यांनी गायिलेल्या ' कहिये तो आसमांको जमींपर उतार लाये , मुश्कील नही है कुछभी अगर ठाम लिजिए ' या ओळीच जणू प्रत्यक्ष रंगमंचावर अवतरल्या होत्या. खय्याम यांनी सार्थ अभिमानाने यावेळी सांगितले की ' आशाजीके लिये मुश्कील कुछभी नही है '. पुरस्कार स्वीकारल्यावर कलावंत-रसिकांशी साधलेल्या संवादातही आशाबाईंनी आपल्या कलेचे वय केवळ २८ वर्षे आहे असे सांगत ' पायतळी पथ तिमिरी बुडला ' या मनोवृत्तीत आपण कधीच रमत नसल्याचे सिद्ध केले.

' युथ आयकॉन ' पुरस्कार प्राप्त झालेले सुनील खांडबहाले हे मटाच्या कायम आधुनिकतेचा हात धरण्याच्या प्रवृत्तीचेच प्रतीक होते. मराठी भाषा जगवायची असेल , तर मराठी लोकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी तिची सांगड घालता आली पाहिजे , ही मटाची भूमिका आहे. खांडबहाले यांनी इंग्रजी-मराठी शब्दकोष इंटरनेट , मोबाइलवर उपल्बध करून देत , केवळ एका एसएमएसवर इच्छुकापर्यंत शब्दार्थ पोचवत हे साध्य केले. गेल्या वर्षी हाच सन्मान लाभलेल्या अधिक कदम यांच्या हस्ते खांडबहाले यांचा गौरव करीत मटाने मनोरंजन उद्योगाची नाळ सामाजिक वास्तवाशी जोडण्याचा आपला वसा पूर्ण केला. मनोरंजन उद्योग सध्या तरुणाईने फुललेला आहे. परंपरांचे ओझे न बाळगता मराठीची नाळ जागतिक प्रवाहाशी जोडण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्याचेच प्रतीक म्हणून ' लाइफ आफ पाय ' या ऑस्कर सन्मानित चित्रपटासाठी मोलाचे तांत्रिक सहकार्य करणाऱ्या तरुण चमूचा मटा सन्मानच्या व्यासपीठावर गौरव करण्यात आला.

' कोहिनूर मटा सन्मान ' च्या परीक्षकांनीही अंतिम विजेत्यांची निवड करताना बदलत्या काळाची पावले नेमकी ओळखत जाणतेपणी प्रयोग करणाऱ्या , तरुण कलावंतांच्या हाती झळाळत्या ट्रॅाफीज ठेवल्या. उद्याच्या मनोरंजन उद्योगाला नवे रक्त पुरविण्याचे काम यातून नक्कीच होणार आहे. सूत्रसंचालनातही ५० टक्के नव्हे तर महिलांचा १०० टक्के कोटा मान्य करीत मटाने या वर्षी ही जबाबदारी दोन बु्द्धिवान अभिनेत्रींकडे सोपविली होती. काहीतरी वेगळा विचार करीत मराठी चित्रपट , नाटक आणि मालिकांच्या क्षेत्रात गतवर्षी आपल्या कलाकौशल्यातून प्रेक्षकांना जिंकणाऱ्यांचा मटाने गौरव केला. त्या सर्वांना शुभेच्छा. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सोहळ्यातून , तो संपला तरी , कुणाचा पाय निघत नव्हता. सगळ्यांचीच मनोवस्था आशाबाईंच्या ' माझिया मना जरा थांब ना... ' या गाण्यासारखी झाली होती. त्या सर्वांना एकच सांगणे आहे , जरा थांबा , आपली कला दाखवा आणि मग आपण पुन्हा भेटणारच आहोत ; पुढील वर्षीच्या ' मटा सन्मान ' मध्ये.
मोबाइलवर ताज्या बातम्या, लेख, भविष्य, लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा mtmobile.in वर
हा मजकूर ट्विट करा